शैक्षणिकसातारा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन साजरा

स्टार ११ महाराष्ट्र

अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी – एक गंभीर सामाजिक प्रश्न” – मा. न्यायदंडाधिकारी डॉ.विक्रम आव्हाड

मेढा.दि.२९.  सर्वोच्च न्यायालय, दिल्ली, मा. उच्च न्यायालय, मुंबई, ना.महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, आणि मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे आदेशान्वये,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.मेढा येथील दिवाणी न्यायाधीश,क.स्तर,तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ.विक्रम आव्हाड, यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तसेच मेढा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक श्रीमती अश्विनी पाटील, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.प्रमोद घाटगे, जावली तालुका बार संघाचे अध्यक्ष ॲड. श्री.आर.एस.पोफळे, ॲड.श्रीमती.पी.डी गोरे, ॲड. श्रीमती.एन.एस. पवार,ॲड.श्री अनुप लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


याप्रसंगी बोलताना मा. डॉ.विक्रम आव्हाड यांनी सांगितले की,भारतात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्राफिक सब्सटंन्सेस ऍक्ट- १९८५(एनडीपीएस ) नुसार नशीले पदार्थ वापरणे गुन्हा आहे. यासाठी होणारा दंड अगर शिक्षा ही ड्रग्सचा किती प्रमाणात वापर होतो त्यावर अवलंबून असते.युवा पिढीमध्ये अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी करण्याचे प्रमाण वाढत आहे हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला असून युवकांनी अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे असे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.


अध्यक्षीय मनोगतातून बोलताना प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी म्हणाले की अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी ही बाब समाजाच्या आणि एकंदर राष्ट्राच्या प्रगतीला मारक ठरत आहे. दिवसेंदिवस आपली युवा पिढी अमली पदार्थ सेवनाच्या जाळ्यात अडकत असल्याचे आढळत आहे.कोणत्याही देशाच्या प्रगतीचा प्रमुख आधारस्तंभ युवक हाच असतो.म्हणून भावी पिढीला अमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी समाजजागृती करणे ही युवा पिढीची जबाबदारी आहे.


दरवर्षी २६ जून हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी याबाबत विद्यार्थी वर्गात जाणीव जागृती करण्याच्या प्रमुख उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या मार्फत करण्यात आले होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस.अधिकारी डॉ.संजय धोंडे यांनी केले.प्रा.प्रकाश जवळ यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रा.सौ.गायत्री जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!