मुसळधार पावसात कातळ कडे भेदित प्रशासन व पदाधिकारी पोहोचले धोकादायक कामतवाडीत ; तातडीने निवारा शेड बांधणार

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-
महाबळेश्वर. दि .३१. महाबळेश्वर तालुक्यात जगबुडी नदीच्या उगमाजवळ डोंगर कपारीत धोकादायक असलेल्या कुमठे गावच्या कामतवाडीत आज प्रशासन व लोकप्रतीनिधी अक्षरशः मुसळधार पावसात कार डोंगरकड्यातून वाट काढत पोहोचले. या ठिकाणावरील परिस्थिती पाहून या वस्तीचे तातडीने पुनर्वसन करण्याचा आराखडा जागेवरच बनवून दोन दिवसात या वस्तीचे स्थलांतर निवारा शेडमध्ये करण्याचे नियोजन करण्यात आले.

महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी तातडीने धोकादायक ठरणाऱ्या कामतवाडी ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा दिल्या पण ग्रामस्थांनी आमचे जीवनमान असणाऱ्या गुरांची सोय केल्याशिवाय जाणार नसल्याचा निर्धार केल्याने. काल तहसीलदार तेजस्विनी पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, रमेश चोरमले ,लक्ष्मण मोरे, सचिन उत्तेकर, सर्कल किशोर खटावर, ग्रामसेवक धैर्यशील गायकवाड, सरपंच संतोष जाधव, सुरेश जाधव, ग्रामसेवक श्री. चिटकूळ, सर्कल ,तलाठी व ग्रामस्थ डोंगरातून वाट काढीत वाडीत पोहोचले.
यावेळी सर्व परिस्थितीची पाहणी केल्यानंतर या वाडीच्या वर असणाऱ्या जागेत या कुटुंबांना राहण्यासाठी निवारा शेड, वीज व्यवस्था, गुरांसाठी गोठा बांधून देण्याचे ठरविण्यात आले. आणि लागलीच कार्यवाही करून दोन दिवसात त्यांचे स्थलांतर होणार असल्याचे यावेळी तहसीलदार यांनी सांगितले. यावेळी वीजवितरण अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, वनविभाग यांचे अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला.राजेंद्र शेठ राजपुरे यांनी आमदार मकरंद आबा पाटील यांचेशी थेट संवाद साधून त्यांना कायमची पत्र्याचे शेड बांधून देण्याचा प्रस्ताव मांडला असून लागलीच त्याची कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुरेश जाधव,किसन जाधव, विजय जाधव,केशव जाधव,शंकर जाधव, बापू ढेबे संतोष खुटेकर, नारायण जाधव, अंकुश जाधव ,शंकर भिलारे, रामचंद्र भिलारे, अंबाजी जाधव कोडिराम अनपट ,डॉ चव्हाण आदी उपस्थित होते.
त्यांच्या अश्रूपुढे थिजले प्रशासन…..
पहिल्यांदाच आमच्या वस्तीवर आमची विचारपूस करायला प्रशासन आल्याने सुरेश जाधव यांना गलबलून आलें त्यांनी आपल्या अश्रूंना वाट काढून दिली आणि आमचं कायम चांगल पुनर्वसन करून द्या अशी कळकळीची विनवणी केल्याने उपस्थित सर्वजण भर पावसात पावसाने नव्हे तर त्यांच्या आर्जविने थिजून गेले.