दारूमुक्त जावली तालुक्यात ड्राय डे दिवशी मध्यवर्ती ठिकाणी अवैध्य दारूची विक्री…विलासबाबांची दारू विक्रेत्यावर झडप


मेढा.दि.२६. २६ जानेवारीला ड्राय डे संपूर्ण देशभर पाळला जातो.ड्राय डे घोषित करण्यामागे अनेक कारणं आहेत.राष्ट्रीय सण,स्वातंत्र्यसैनिक यांच्या सन्मानार्थ असलेले दिवस आणि धार्मिक सणांच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात.
आज जावली तालुक्यातील मेढा येथिल तहसिल कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त दारूबंदी चळवळीचे नेते व व्यसनमुक्त संघाचे मार्गदर्शक श्री विलासबाबा जवळ प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी निघालेले असताना मेढा बाजारपेठेत मध्यभागी वर्दळीच्या ठिकाणी वनविभागाच्या कार्यालयासमोरून जात असताना हमीद पठाण यांच्या मटण दुकानामध्ये दारू विक्री करीत असताना तन्वीर पठाण व बापू धनावडे हे दिसल्याचे विलासबाबा यांना आढळून आले असता यांनी त्यांच्या जवळच्या दारूच्या बाटल्यांची पिशवी हिसकावून घेतली त्यानंतर काही क्षणात त्या दोघांनी पळ काढला.विलासबाबा यांनी सदर पिशवी मटणाच्या दुकानासमोर ओतून पाहिले असता ४० दारूच्या बाटल्या आढळून आल्या.पिशवी रस्त्यावर ओतताना काही बाटल्या या ठिकाणी फुटल्या.उरलेल्या सर्व बाटल्या पिशवीमध्ये भरून सदर पिशवी दारूच्या बाटल्यांसहीत तहसिलदार कार्यालयात घेवून गेले.ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर मेढा पोलीस स्टेशनचे स.पो.नि.संतोष तासगावकर यांचेकडे दारूच्या बाटल्या भरलेली पिशवी विलासबाबा यांनी जमा केली.

संपूर्ण देशासह महाराष्ट्रात १४ वर्षापूर्वी रणरागिणींच्या माध्यमातून आदर्शवत ठरलेल्या जावली तालुका दारू दुकानमुक्त ठरलेला असताना त्याच जावली तालुक्यात अवैधपणे दारूविक्रेत्यांनी हैदोस घातला असून यांना रोखण्यात उत्पादन शुल्क विभाग अपयशी ठरत आहे.नुकताच जावली तालुक्यात पोलिस प्रशासनाचा नव्याने कारभार हाती घेणारे स.पो.नि.संतोष तासगावकर यांनी रूजू झाल्यापासून अवैध धंद्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. पण तकलादू कायद्यांमुळे हे विक्रेते माजलेले आहेत.आमचे कोणीच काही करू शकत नाही.सर्व खाती आमच्या खिशात असल्याच्या अविर्भावात हे विक्रेते मुजोरपणे वागत आहेत.अशा निर्ढावलेल्या दिवट्यांना जरब बसविणे गरजेचे आहे अशी महिला वर्गातून मागणी होत आहे.

स्व.राजेश नाईक साहेब यांनी त्यांच्या कार्यकाळात या दारू विक्रेत्यांना रस्त्यावर सोलून काढले होते तीच वचक तोच दरारा स.पो.नि.संतोष तासगावकर साहेबांनी दाखवावा अशी जावली तालुक्यातील माय-भगिनींची अपेक्षा आहे.




