
स्टार ११ महाराष्ट्र
मेढा.दि.१४. “ राजमाता जिजाऊ या स्वराज्याच्या संकल्पनेच्या जननी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात त्यांनी दिलेले संस्कार,शौर्य,नीतीमत्ता आणि राष्ट्रप्रेम आजही प्रेरणादायी आहेत. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांनी भारतीय युवकांना आत्मविश्वास, स्वाभिमान, चारित्र्यनिर्मिती आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या तसेच तरुण पिढीच्या उत्कर्षासाठी असे कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करण्याची आवश्यकता आहे “ असे मत प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी व्यक्त केले.
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या इतिहास विभागाच्या वतीने, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी इतिहास विभाग प्रमुख प्रा. एस. एन. गेजगे उपस्थित होते.
त्यानंतर मेजर डॉ.अशोक गिरी सर पुढे म्हणाले “ विध्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांचे संस्कारक्षम मातृत्व, राष्ट्रभक्ती आणि नेतृत्वगुण यांचे सखोल विश्लेषण करून.छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामागे राजमाता जिजाऊ यांचे संस्कार किती निर्णायक होते, “ असे सांगून त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी युवकांनी आत्मविश्वास, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवा या मूल्यांचा अंगीकार करावा, असे आवाहन केले. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीपुरती मर्यादा न ठेवता सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी शांततेत आणि आदरभावाने या महान विभूतींना अभिवादन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्रा. शंकर गेजगे यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी राजमाता जिजाऊ यांचे मातृत्व, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यावर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच स्वामी विवेकानंद यांनी भारतीय युवकांना दिलेला “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” हा संदेश आजच्या युवकांसाठी किती महत्त्वाचा आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. इतिहास हा केवळ भूतकाळ नसून वर्तमान आणि भविष्य घडविण्याचे साधन आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला इतिहास विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आदर्श व्यक्तिमत्त्वांचे जीवन, विचार आणि मूल्ये समजून घेण्याची संधी मिळाली. अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.कार्यक्रमाचा समारोप डॉ. संजय भोसले यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी प्राचार्य महोदयांचे मौलिक मार्गदर्शन, तसेच विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.



