सामाजिक

नागरिकांच्या जीविताशी संबंधित  असल्याने झेब्रा क्रॉसिंग व स्पीड ब्रेकर तात्काळ बसवावेत; सुहास चव्हाण

स्टार ११ महाराष्ट्र

  झेब्रा क्रॉसिंग व स्पीड ब्रेकरच्या मागणीसाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्यावतीने मागणी

मेढा.दि.२९.  केळघर ता.जावली येथील बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग व स्पीड ब्रेकर तात्काळ बसविण्यात यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष जावळी तालुका यांच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग जावली यांना निवेदन देण्यात आले.

केळघर बाजारपेठ परिसरात रस्त्यालगत शाळा, दवाखाना तसेच इतर महत्त्वाची ठिकाणे असून या मार्गावरून विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र महाबळेश्वर येथे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर स्थानिक नागरिक व पर्यटक यांच्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून अनेक वाहने वेगाने जात असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण होत आहे. यापूर्वी या ठिकाणी अनेक छोटे अपघात घडले असून भविष्यातही गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही,असे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्यावतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केळघर बाजारपेठ येथे तात्काळ झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या मारण्यात याव्यात, तसेच आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शाळा व दवाखान्याच्या परिसरात योग्य ती वाहतूक सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

ही बाब नागरिकांच्या जीविताशी संबंधित अत्यंत गंभीर असून याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी सुहास चव्हाण यांनी केली आहे. तसेच सदर मागणीची तात्काळ पूर्तता न झाल्यास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संबंधित कार्यालयाबाहेर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, याची संबंधित प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी, असा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे.

यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष जावळी तालुका अध्यक्ष सुहास चव्हाण (आमन), सचिव प्रजित गायकवाड, चेतन चव्हाण, निमेश कांबळे, सारंग कांबळे, प्रकाश गाडे, सूर्यकांत जाधव तसेच पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबत संबंधित बांधकाम विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!