
स्टार ११ महाराष्ट्र
केळघर विभागातील भाजप पदाधिकाऱ्यांनी बसफेऱ्या वाढविण्याची केली मागणी
केळघर : जावली तालुक्यातील केळघर ते बोंडारवाडी येथे एसटी बसच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवासी,विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या केळघर विभागातील पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन देत बसफेऱ्या वाढविण्याची मागणी केली.
केळघर परिसरातील अनेक गावांमधून ये-जा करणाऱ्या नागरिकांना सध्या बससेवेच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरी-व्यवसायासाठी जाणारे नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे समाजसेवक बळवंत पाडळे यांनी आगार व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी आगार व्यवस्थापकांशी प्रत्यक्ष चर्चा करून प्रवाशांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या. तसेच भाजपा कार्यकर्त्यांकडून केळघर बोंडारवाडी मार्गांवर बसच्या नवीन फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
यावर आगार व्यवस्थापकांनी नागरिकांच्या मागण्यांचा विचार करून बसच्या नवीन फेऱ्या वाढविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
यावेळी बळवंत पाडळे,विशाल दळवी, प्रदीप शेलार,राजेंद्र पवार,विलास पाडळे,भानुदास ओंबळे,सुरेश पार्टे,दत्ता जाधव,सचिन बैलकर उपस्थित होते.
एसटीच्या फेऱ्या वाढल्यास केळघर विभागातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या आगार व्यवस्थापक यांनी दिलेल्याआश्वासनाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी,अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



