
स्टार ११ महाराष्ट्र
मेढा.दि.१८. बोंडारवाडी धरण कृती समितीचे संस्थापक जलनायक कै.विजयराव मोकाशी साहेब यांच्या चौथ्या स्मृतिदिना वरोशी (ता. जावळी) येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. विजयराव मोकाशी यांनी परिसरातील ५४ गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी आयुष्यभर अविरत संघर्ष केला. त्यांच्या जनसेवेच्या व सामाजिक बांधिलकीच्या वारशाला पुढे नेण्यासाठी बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे कृती समितीचे निमंत्रक आदिनाथ ओंबळे यांनी सांगितले.
शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत शारीरिक तपासणी व वैद्यकीय सल्ला, रक्तदाब (BP), रक्तातील साखर (Sugar) व इतर प्राथमिक तपासण्या, तसेच आवश्यकतेनुसार मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शिबिराची तारीख : रविवार, २० सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
स्थळ : प्राथमिक शाळा / समाजमंदिर, वरोशी, ता. जावळी, जि. सातारा
विविध सामाजिक कार्यक्रमांसह महाआरोग्य शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिक व रुग्णांनी घ्यावा,असे आवाहन बोंडारवाडी धरण कृती समिती निमंत्रक आदिनाथ ओंबळे व मोकाशी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.



