राजकीय

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पोस्टरचा अवमान शिवसैनिक  सहन करणार नाहीत ; प्रणव सावंत

शायना एन. सी. यांच्या विरोधात साताऱ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तीव्र निषेध आंदोलन

सातारा प्रतिनिधी :  शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे केवळ एका राजकीय पक्षाचे नेते नव्हते, तर लाखो शिवसैनिकांच्या हृदयात विराजमान असलेले श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या विचारांवर, त्यांच्या संघर्षावर आणि त्यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेवर निष्ठा ठेवून लाखो शिवसैनिक आजही वाटचाल करत आहेत. अशा बाळासाहेब ठाकरे यांच्या पोस्टरला फाडल्याच्या कथित प्रकाराचा सातारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.


गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी साताऱ्यातील ऐतिहासिक शिवतीर्थ, पोवई नाका येथे शायना एन. सी. यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले. हिंदुरुदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचा अवमान म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे. हा अवमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली.


उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील व उपनेत्या छायाताई शिंदे यांच्या सूचनेनुसार, संपर्कप्रमुख उदय दळवी आणि जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे जिल्हा संघटिका अमृता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री . प्रणव सावंत शिवसेना सातारा शहरप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना स्पष्ट केले की, बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान हा केवळ एका छायाचित्राचा किंवा पोस्टरचा विषय नाही, तर तो त्यांच्या विचारांशी, त्यांच्या कार्याशी आणि त्यांच्या असंख्य अनुयायांच्या भावनांशी जोडलेला विषय आहे.

बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाने जगायला, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढायला शिकवले. त्यामुळे त्यांच्या अवमानाविरोधात आवाज उठवणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे कर्तव्य आहे.या प्रकरणावरून शिंदे गटालाही शिवसैनिकांनी जाब विचारत आपला रोष व्यक्त केला. बाळासाहेबांच्या नावाचा आणि विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेच्या अवमानाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरप्रमुख प्रणव सावंत यांनी सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे हे आमच्या शिवसैनिकांसाठी केवळ नेते नाहीत, तर आमच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि हिंदुत्वाच्या विचारांचा आधार आहेत. त्यांच्या एका हाकेवर लाखो शिवसैनिक रस्त्यावर उतरले, संघर्ष केला आणि शिवसेना उभी राहिली.

आजही प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाच्या मनात बाळासाहेबांबद्दल तेवढाच आदर, प्रेम आणि अभिमान आहे. त्यांच्या पोस्टरचा अवमान झाल्याचा प्रकार आम्ही तीव्र शब्दांत निषेधार्ह मानतो. राजकीय मतभेद असू शकतात, विचारांचा संघर्ष असू शकतो; मात्र श्रद्धास्थानांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. बाळासाहेबांचा अपमान आम्ही शांतपणे पाहणार नाही. या घटनेची योग्य दखल घेऊन संबंधितांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.”

या आंदोलनावेळी निमिष शहा, रविराज बडदरे,शैलेश बोडके, सागर धोत्रे, रमेश बोराटे, सुनील पवार, मंगेश जाधव, अक्षय भोसले, वैभव घोलप, सुमित नाईक, गणेश अहिवळे, शिवाजी इंगवले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळासाहेबांचे विचार आमच्या शिवसैनिकांच्या रक्तात आहेत, त्यांचा स्वाभिमान आमच्या श्वासात आहे आणि त्यांच्या सन्मानासाठी प्रत्येक शिवसैनिक शेवटपर्यंत ठामपणे उभा राहील

              प्रणव सावंत

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!