म्हाते खुर्दच्या येथे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ
मेढा.दि.२०.म्हाते खुर्द ता. जावली या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधुन श्री भैरवनाथाच्या वार्षिक भंडा-या निमित्ताने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी म्हाते खुर्द गावासाठी ३०हून अधिक विकास कामांसाठी अंदाजे अडीच कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यावर्षी महाशिवरात्रीला जोडुनच शिवजयंती आल्याने वार्षिक भंडारा व शिवजयंती उत्सव एकत्रितपणे मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. ग्रामदैवत भैरवनाथाच्या दिंडी साेहळ्यात परमेश्वराचा गजर व शिवछत्रपतींच्या जयघोषांनी म्हाते खुर्द गावचा परीसर दणाणून गेला होता.दोन दिवसांच्या या सोहळ्यात हरीपाठ,किर्तन, भजनाचे कार्यक्रम संपन्न झाले. काल्याचे किर्तन हभप प्रविण महाराज शेलार व महाशिवरात्रीला हभप विक्रांत महाराज शिंदे यांनी किर्तनरुपी सेवेतून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.
म्हाते पंचक्रोशीतील तमाम वारकरी मंडळींनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखविली.प्राथमिक शाळा म्हाते खुर्द व कै. आण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक सादरीकरण करुन रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. या भक्तीमय सोहळ्याच्या निमित्ताने संबोधीत करताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याची भावना बोलुन दाखविली, यावेळी त्यांनी बोंडारवाडी धरणाच्या एक टीएमसी धरण बांधणी प्रकल्पाचा पुनोरोच्चार करून लवकरच याबाबत शासन दरबारी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे बोलुन दाखविले.
यावेळी म्हाते खुर्द गावचे सरपंच राजाराम दळवी सर यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी गावच्या विकासासाठी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभार मानले.या कार्यक्रमास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन ग्रामस्थ मंडळ, नेहरू मंडळ, नवयुग मंडळ, नवयुग विकास पतपेढी, भजन मंडळ, महिला मंडळ या म्हाते खुर्द गावच्या मातृसंस्थानी केले असल्याची माहिती पत्रकार विकास दळवी यांनी दिली.



