
सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय विरोधकांचा २१-0 ने सुपडा साफ; अडीच हजारांच्या मताधिक्क्याने विजय
सातारा. दि.१९. सातारकारांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या जनता सहकारी बँकेवर विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील भागधारक पॅनेलने सलग दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत बाजी मारली. रविवारी मतमोजणीच्या दिवशी १७ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले.

यामध्ये भागधारक पॅनेलच्याच उमेदवारांनी मताधिक्यांने विजय मिळवला. तर यापूर्वी पॅनेलचे चार उमेदवार बिनविरोध झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत भागधारक पॅनेलने विरोधकांचा २१-0 असा धुव्वा उडवला. पॅनेलचे सर्व उमेदवार हे तब्बल दोन ते अडीच हजारांच्या मताधिक्क्याने निवडून येताच बँकेचे किंगमेकर विनोद कुलकर्णी यांना कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेत जल्लोषात गुलालाची उधळण केली.
सातारा शहराची अस्मिता असलेल्या जनता बँकेचा निवडणुक कार्यक्रम गत महिनाभरापूर्वी जाहीर झाला होता. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी असणाऱ्या भागधारक पॅनेलने बँक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले.
विनोद कुलकर्णी यांनी सर्वसामावेशक संचालक मंडळ तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. पॅनेल प्रमुख म्हणून भूमिका बजावताना त्यांनी विरोधी पॅनेलमधील अनेक सदस्यांना बँक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यामध्ये बहुतांश जणांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे महिला राखीव, अनुसूचित जाती-जमाती आणि भटक्या विमुक्त जाती जमाती हे मतदारसंघ बिनविरोध झाले.



