स्वतःच्या गावात किंमत नसणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांनी आमच्या गावात राजकारण करून स्वतःची तुंबडी भरण्याचा प्रयत्न करू नये : आंब्रळच्या सरपंच माधुरी आंब्राळे

भिलार दि.१३ : आंब्रळ गावच्या विकासासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ कटिबध्द असून ज्यांना स्वतःच्या गावात किंमत नाही त्या तथाकथित पुढाऱ्यांनी आमच्या गावात येवून राजकारण करीत स्वतःची तुंबडी भरण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या या कूटनीती राजकारणाचा आम्ही सडेतोड पंचनामा करणार असल्याचे प्रतिपादन सरपंच माधुरी आंब्राळे यांनी केले.
आंब्रळ (ता. महाबळेश्वर) येथील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आ. मकरंद आबा पाटील आणि पंचायत समिती सदस्य रुपालीताई राजपुरे यांच्या सहकार्याने डोंगरी विकास निधीतून 8 लाख रुपये मंजूर झाले असून हे काम सध्या कार्यान्वित झाले आहे. हे काम चालू असताना भाजपचे तालुका अध्यक्ष मधुकर बिरामने यांनी या कामाबाबत शंका घेत गावातील वातावरण दूषित केले. याबाबत माहिती देताना सरपंच सौ. आंब्राळे बोलत होत्या. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष आंब्राळे, दिलीप आंब्राळे, उपसरपंच उमेश जाधव, साहेबराव आंब्राळे, गुलाब आंब्राळे, राजेंद्र आंब्राळे, विशाल जाधव, प्रल्हाद आंब्राळे, ग्रामपंचायत सदस्य भानुदास बिरामने आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपसरपंच उमेश जाधव म्हणाले आंब्रळ गावात मंजूर झालेले रस्त्याचे काम हे उत्कृष्ट दर्जाचे झाले असून हे काम इस्टीमेंट प्रमाणे आम्ही सर्व ग्रामस्थ यांनी उभे राहून केले आहे. त्यामुळे या कामात कसलीही कुचराई झालेली नाही. भाजप अध्यक्षानी चांगल्या कामात ढवळा ढवळ करून गावातील वातावरण दूषित करण्यापेक्षा विकासाला महत्त्व द्यावे. आमच्या गावात लुडबुड करण्याचा तुम्हाला अधिकार कुणी दिला याच उत्तर आम्हाला पाहिले द्यावे व आपण काय करतोय याच आत्मपरीक्षण करावे आणि मगच दुसऱ्याचे दोष द्यावे असा घणाघात केला.
आ. मकरंद आबा पाटील आणि राजेंद्र शेठ राजपूरे यांचा माध्यमातून आमच्या गावच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असून ज्या पक्षाने आमच्या गावाला रुपयाचा निधी दिला नाही त्यांनी दुसऱ्याच्या गावात काय विकास आणि कसा विकास चाललाय हे डोकावून पाहू नये. पाहिले निधी आणण्याचा मोठेपणा दाखवावा आणि नंतरच आपण स्वतः भागाचे व तालुक्याचे तारण कर्ते म्हणून मिरवावे असा टोला जावली – महाबळेश्वर बाजार समितीचे संचालक संतोष आंब्राळे यांनी मधुकर बिरामने यांना दिला.

आंब्रळ : रस्त्याची पाहणी करताना सरपंच माधुरी आंब्राळे व इतर ग्रामस्थ (रविकांत बेलोशे)



