सामाजिक

सातारा जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आराखड्याची निर्मिती


– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सातारा, दि. 9 (जि.मा.का.) सातारा जिल्ह्याची सर्वांगिण प्रगती करुन सर्वसामान्य नागरिकांचे उत्पन्न दुपटीने किंवा त्यापेक्षाही जास्त वाढविण्यासाठी जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये अल्प, मध्यम व दिर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत. आराखड्याची अंमलबजावणी सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर करुन जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

सातारा जिल्ह्याचा विकास आराखडाबाबत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, उपवनसंरक्षक श्रीमती भारद्वाज, परिवेक्षाधिन आयएस अधिकारी श्री. चंद्रा, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

सातारा जिल्ह्याला गौरवशाली परंपरा लाभलेली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, जिल्ह्याचा साक्षरता दर चांगला आहे. येथील शेतकरी समृद्ध आणि प्रगतशील आहेत. जिल्ह्यात कृषी आणि पर्यटन या दोन क्षेत्रांमध्ये वृद्धीची खूप मोठी क्षमता आहे. पुणे आणि मुंबई जवळ असल्याने मोठ्या बाजार पेठा उपलब्घ आहेत. दळणवळणाच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे येत्या काळात कृषी आणि पर्यटन या दोन क्षेत्रांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करुन त्यांच्या विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्यात येतील.

भाजी आणि फळे यामध्ये जास्तीत जास्त सेंद्रीय उत्पादन घेणे, त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, उत्तम दर्जाचे बियाणे उपलब्ध करुन देण्यात येतील. पुणे मुंबई येथील मोठ्या बाजारपेठांशी त्यांना जोडणे तसेच शेतकरी कंपन्यांना एकत्र करुन अधिक चांगल्या प्रकारे उत्पादनांवर प्रक्रिया करणे यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येतील. गावेच्या गावे रेशीम उत्पादन, मधुमक्षीका, मस्त्य उत्पादन करणारी निर्माण व्हावीत यासाठी संबंधित विभागांमार्फत सूक्ष्म आराखडे तयार करण्यात येतील. पर्यटकांना गुणवत्तापूर्ण आणि मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. अशा विविधअंगी प्रयत्नातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे प्रयत्न करण्यात येतील. सातारा जिल्ह्याला लाभलेल्या वैविध्यपूर्ण नैसर्गिक स्थितीचा वापर करुन मिनी भारताची निर्मिती करु शकू त्याचा वापार विविध अंगी पर्यटनासाठी करण्यात येईल,असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी यावेळी सांगितले.

सातारा जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेले आदर्श शाळा, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र यासारखे उपक्रम हा देखील विकास आराखड्याचा भाग असल्याचे जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी यावेळी सांगितले. संतुलीत शहरी करणाच्या वाढीसह सातारा जिल्हा एक वाढीव ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणून उदयास आणणे कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसह नाविन्यपूर्ण उपक्रम, उद्योजकता, शैक्षणिक आणि तंत्रज्ञान केंद्र म्हणून पुढे आणणे आणि या सर्वांसाठी सुलभ आधुनिक आणि माहिती पूर्ण कृषी पद्धती विकसीत करुन कृषी संलग्न प्रक्रियांचे उत्पादन वाढविणे या द्वारे जिल्ह्याचा विकास साध्य करणे हे आराखड्याच्या निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी स्पष्ट केले.
0000

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!