
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-
मित्रमेळा फाउंडेशन व डांगरेघर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम..
मेढा, ता.०६: ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार हा सर्वत्र मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो. याच मैत्रीदिनाचे औचित्य साधून “एक झाड मैत्रीचं” हा संदेश देत डांगरेघर ता. जावली येथे मित्रमेळा फाउंडेशन जावली व ग्रामपंचायत डांगरेघर यांच्यामाध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावच्या रस्त्याच्या दुतर्फा तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवारी सर्वत्र मैत्रीदिन उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी जुने मित्र एकमेकांना भेटतात, मैत्रीच्या आठवणी ताज्या करत आयुष्याच्या शेवटपर्यंत मैत्री न तोडण्याची वचने एकमेकांना देत विविध पद्धतीने मैत्रीदिन साजरा करतात. मात्र मैत्रिदिनाच्या या जुन्या संकल्पनांना फाटा देत जावली तालुक्यातील मित्रमेळा फाउंडेशन व ग्रामपंचायत डांगरेघर यांनी यावर्षीचा मैत्रीदिन हा निसर्गासोबत साजरा केला आहे.

मैत्रीदिनाचे औचित्य साधत मित्रमेळा फाउंडेशन व ग्रामपंचायत डांगरेघर यांनी एक झाड मैत्रीचं या संकल्पनेखाली डांगरेघर गावातून धावली गावाला जाणाऱ्या रस्त्याला तसेच गावच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण केले आहे. यावेळी पिंपळ, जांभूळ, करंज, बेल, शेवगा, कवट, आवळा इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच यावेळी गावात असणाऱ्या प्राथमिक शाळेतील मुलांना सुद्धा झाडे भेट देण्यात आली. यावेळी या वृक्षारोपन कार्यक्रमासाठी मित्रमेळा फाउंडेशन तसेच डांगरेघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





