स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
मेढा.दि.२७. पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून कीर्तनाचे आयोजन व यावेळी जमलेल्या शेकडो लोकांना सत्कारामध्ये शाल-श्रीफळ देण्याऐवजी झाडांच्या रोपांचे वाटप करून अनोखा सामाजिक संदेश देण्याचे काम गजवडी येथिल कदम परिवार करीत असून हा उपक्रम स्तुत्य असून याचे समाजाने अनुकरण करायला हवे असे मत महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार सुप्रियाताई साठे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
गजवडी ता.सातारा येथिल बाबामहाराज गजवडीकर यांच्या पत्नी वै.सौ,सुमन कदम यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात कीर्तनकार सुप्रियाताई साठे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रामाला सातारा जिल्ह्यातून मा.राजु भैय्या भोसले, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत,श्रीरंग देवरूखे,वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव सापते इ. मान्यवरांसह वारकरी,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबामहाराज गजवडीकर यांच्या कन्या जवळवाडी ग्रामपंचायतीच्या मा.सरपंच वर्षाताई जवळ व त्यांच्या भगिनी रेखा जाधव,आरती जाधव,मुक्ता शिंदे,संजिवनी पवार,अनुजा शेलार यांच्या संकल्पनेतून गेली चार वर्षे अनुक्रमे लिंबू-बेल,कडीपत्ता, शेवगा आणि या वर्षी सोनचाफा अशा शेकडो झाडांच्या रोपांचे वाटप आलेल्या लोकांना करण्यात येते.
“नको शाल,नको श्रीफळ आता,करू वृक्षारोपण नटवू हिरवाईने धरती माता।” हाच संदेश देवून आई शरिराने जरी नसली तरी आईच्या स्मृती वृक्षलागवडीतून जपण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याच्या भावना वर्षाताई जवळ आणि त्यांच्या भगिनींनी व्यक्त केल्या.