सातारा शहरातील २ प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी १२४ कोटी ८६ लाख; मेढा स्मशानभूमी विकासासाठी २ कोटी ३० लाख मंजूर.. मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा धडाका;

स्टार ११ महाराष्ट्र
सातारा- सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून दोन महत्वाच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी तब्बल १२४ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. याशिवाय त्यांनी मेढा नगरपंचायत हद्दीतील स्मशानभूमी विकसित करणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी २ कोटी ३० लाख रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे सातारा व मेढा या दोन्ही शहराच्या विकासाला बूस्टर मिळाला आहे. निधी मंजूर केल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि ना. सुनेत्राताई पवार यांचे आभार मानले आहेत.
सातारा शहरातील आणि मेढा नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या दरे येथील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी सातारा पालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, फिरोज पठाण आदी उपस्थित होते. ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सुचवलेल्या कामांना ना. शिंदे यांनी नगर विकास विभागाकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. सातारा शहरातील दोन रस्ते नव्याने खोदून दर्जेदार काँक्रीटीकरण करणे, सर्व्हिस डक्ट, नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन, अंडरग्राऊंग विद्युत केबल्स, पथदिवे बसवणे आदी कामे करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावयाच्या मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमा, रस्ता अनुदान योजनेंतर्गत १२४ कोटी ८६ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यामध्ये सातारा बस स्थानकाशेजारील सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ते कोटेश्वर मंदिर पर्यंतचा रस्ता (राधिका रोड) विकसित करणे (७०.६० कोटी) आणि राजपथावरील शाहू चौक ते राजवाडा गोलबाग चौक पर्यंत रस्ता विकसित करणे (५४.२६ कोटी) या दोन रस्त्यांचा समावेश आहे. भू विकास बँक ते जुना आरटीओ चौक रस्त्याच्या धर्तीवर या दोन्ही रस्त्यांचे काम होणार असल्याने हे दोन्ही रस्ते दीर्घकालीन मजबूत आणि टिकाऊ होणार आहेत.
जावली तालुक्यातील मेढा नगरपंचायत हद्दीतील स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासाठीच्या जमिनीचा प्रश्न ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यापूर्वीच मार्गी लावला होता. या स्मशानभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून हा निधी मंजूर झाला असून या निधीतून स्मशानभूमी परिसर विकसित करणे, सुशोभीकरण, पोहोच रस्ता, लोकांसाठी बसण्याची व्यवस्था, पाणी टाकी, तसेच अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. मेढा स्मशानभूमीसाठी भरीव निधी उपलब्ध झाल्याने शहराचा एक मोठा प्रश्न मार्गी लागला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
८ दिवसात तब्बल २०९.९१ कोटी
ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी विकासकामांचा धडाका लावला असून त्यांच्या माध्यमातून गेल्या ८ दिवसांत राज्याच्या नगर विकास विभागाकडून तब्बल २०९.९१ कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सातारा शहरातील राधिका रोड व राजपथ रस्ता काँक्रीटीकरण व अन्य कामे करण्यासाठी १२४.८६ कोटी रुपये आज मंजूर झाले आहेत. मेढा नगर पंचायत येथील स्मशानभूमी सुशोभीकारण व अनुषंगिक कामे करण्यासाठी २.३० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. शहरातील शाहू कला मंदिर नव्याने बांधण्यासाठी ७२ कोटी निधी कालच मंजूर झाला आहे. दरम्यान, पोवई नाका शिवतीर्थ येथील छत्रपती शिवरायांचा ४० फुटी पुतळा (चबुतऱ्यासह) उभारण्यासाठी ५.७५ कोटी, भैरोबा टेकडी परिसर सुशोभीकरण करण्यासाठी ५ कोटी रुपये काही दिवसांपूर्वीच मंजूर करण्यात आले आहेत.



