Uncategorizedमहाराष्ट्रशैक्षणिक

छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होते प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–

मेढा. दि.२७.” छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होते. त्यांच्या अलौकिक कार्यामुळे ते लोकराजा म्हणून ओळखले जात होते.त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात कार्य सुरु केल्यानंतर समाजातील सर्वच घटकांसाठी समता हे तत्व अंगीकरून, अनमोल कार्य केले म्हणूनच आज आपण त्यांचा जन्मदिवस सामाजिक समता दिवस म्हणून साजरा करतो ” असे मत प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी व्यक्त केले.


जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.संजय धोंडे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डॉ.विनोद पवार उपस्थित होते.


प्राचार्य डॉ. गिरी सर पुढे म्हणाले ” इ. स. १८८५ मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर एस.एम. क्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले. धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल १८९१ रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला. शिक्षणक्रम संपल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी २ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी सहकार्य केले. चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला.

२६ जुन हा शाहु महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासुन”सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे.शाहू महाराजांनी सरकारी नोकऱ्यांत मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला, वाघ्या-मुरळी प्रतिबंधक कायदा केला. स्त्री पुनर्विवाह कायदा केला. आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले. कोल्हापूर येथे “शाहपूरी” ही गुळाची बाजारपेठ सुरु केली. शाहूंनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वस्तीगृहे सुरु केली. अस्पृश्यांसाठी “मिस क्लार्क” हे वस्तीगृह स्थापन केले.१५ टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली.अशा या राजाचा गौरव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ अशा शब्दांत त्यांना गौरविलेले आहे.” अशा शब्दात प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ.संजय धोंडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. शेवटी ग्रंथपाल डॉ.सुधीर नगरकर यांनी आभार मानले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!