
स्टार११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
मेढा.दि.०८. जावली येथिल वेण्णानदी तिरावर असणार्या विटभट्यांवर शेकडो महिला कार्यरत असून महिला दिनाच्या निमित्ताने या श्रमणार्या महिलांचा सन्मान बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाने व्यसनमुक्त युवती-महिला आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने करण्यात आला.

संपूर्ण जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मोठमोठे इव्हेंट या दिवशी साजरे केले जातात. महिलांमध्ये महिला दिनाचा उत्साह जाणवतो. पण या महिला दिनाच्या दिवशीच अशा काही कुटुंबांमध्ये महिला भगिनींच्या नशिबी मात्र कष्ट, कष्ट आणि फक्त कष्टच करावे लागते. या महिलांसाठी ना महिला दिन, ना दुर्गा उत्सव,ना आनंद सोहळा आयुष्यभर फक्त येईल दिवस सारखा समजून कष्ट आणि कष्टच करावे लागतात.
उसतोड मजुर महिला असोत की, विटभट्टीवर काम करणार्या महिला यांच्या जीवनात प्रत्येक दिवस हा फक्त कष्टाचाच असतो. दिवाळी संपली की,आपला जिल्हा, आपल राज्य सोडून आपल्या कुटुंबासोबत विटभट्ट्यांवर त्या दाखल होतात. पाल टाकून खोपटाचा नावालाचं आधार असतो. भल्या पहाटे पासून कामाला सुरवात होते. दिवसभर आग ओकणारा सुर्य डोक्यावर घेवून या महिला आपल्या व कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी राबताना दिसतात.या महिलांचा सन्मान करण्यासाठी व्यसनमुक्त महिला आघाडी महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने मेढयातील उद्योजक महिला सोनाली प्रविण गाडवे,संध्या अरूण मर्ढेकर,रूपाली ज्ञानेश्वर सावंत, वर्षा रोहीत जाधव,सिमा अरूण जवळ यांच्या हस्ते मेढा येथिल विटभट्टीवर काम करणार्या ५० महिलांचा साडी-चोळी देवून सन्मान करण्यात आला.उपस्थित सर्व महिला व त्यांचे कुटुंबिय यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना व्यसनमुक्त महिला आघाडीच्या संघटक व जवळवाडीच्या मा.सरपंच वर्षाताई जवळ म्हणाल्या उंच-उंच इमारती, टोलेजंग घरे उभी रहातात खरी पण या इमारतींना वापरण्यात आलेल्या विटांमध्ये माती बरोबरच या महिलांच्या घामाच्या धारा मिसळलेल्या असतात याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी.या कुटुंबातील लहानमुले याचींही खुप परवड होत असते. शिक्षणापासून कायम वंचित रहाणार्या या मुलांच्या भविष्याचा विचार करायला हवा.
आजही अशा अनेक क्षेत्रात महिला आहेत त्यांना अपार कष्ट करावे लागते.या महिलांच्या कष्टाची जाणीव आपल्या प्रत्येकाला व्हायला हवी तोच खऱ्या अर्थाने महिला दिन असेल असे प्रतिपादन सोनाली गाडवे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रूपाली सावंत यांनी केले तर आभार वर्षा जाधव यांनी मानले.



