स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
केळघर.दि.०९. जावळी तालुक्यात प्रतापगड कारखान्याची उभारणी करण्यासाठी आव्हानांचा सामना करून लालसिंगराव शिंदे व राजेंद्र शिंदे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हक्काचा प्रतापगड सहकारी साखर कारखाना उभा केला.हा कारखाना संस्थापक पॅनेलकडेच राहिला पाहिजे अशी माझी भूमिका असून जे कारखान्याचे साधे सभासद नाहीत त्यांना कारखान्याचा पुळका का येत आहे. हे तालुक्यातील कारखान्याचे सभासद चांगलेच ओळखून असून या निवडणुकीत सौरभ शिंदे यांच्या संस्थापक पॅनेलचा विजय निश्चित आहे. असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
केळघर विभागातील कारखान्याच्या सभासदांशी संवाद साधताना आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, सौरभ शिंदे, शिवाजीराव मर्ढेकर, आनंदराव सपकाळ, आनंदराव जुनघरे,मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, विजय सुतार, राजेंद्र शिंदे, प्रदीप शिंदे, हरिभाऊ शेलार, सुनील जांभळे, सागर धनावडे,संतोष कासुर्डे,अंकुश बेलोशे यांच्यासह संस्थापक सहकार पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते.
आ.शिवेद्रसिंहराजे भोसले म्हणाले, एखादी संस्था उभी करताना संघर्ष करावा लागतो. लालसिंगराव काका व राजेंद्र शिंदे यांनी प्रतापगडच्या उभारणीसाठी मोठे योगदान दिले.जे कारखान्याचे सभासद नाहीत ज्यांच्या पॅनेलला पूर्ण उमेदवार मिळाले नाहीत ज्यांनी कारखाना सुरू होताना विरोध केला , ते कारखान्याचा बचाव कसा करणार असा टोलाही त्यांनी दीपक पवार यांचे नाव न घेता लगावला.या निवडणुकीत सर्व पक्षीय कार्यकर्ते असलेले उमेदवार संस्थापक सहकार पॅनेलमध्ये आहेत. या कारखान्यास भविष्यात आमदार म्हणून सहकार्य करणार असून तालुक्याच्या प्रगतीसाठी सौरभ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विजय मिळणार हे नक्की आहे.असा विश्वास ही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक श्री. रांजणे यांनीही संस्थापक सहकार पॅनेलला विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी केळघर परिसरातील शेतकरी, सभासद उपस्थित होते. रामभाऊ शेलार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.



