सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे
– खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक संपन्न
सातारा, दि. ११: जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने एकत्र काम करावे, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण(दिशा) समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ प्रिया शिंदे, विधान परिषदेचे आमदार धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ,जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद्ध यांच्यासह समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार श्री. भोसले म्हणाले, “दिशा समितीच्या सदस्यांनी केंद्र शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीविषयी लेखी म्हणणे मांडावे. अधिकाऱ्यांनी शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांना महत्त्व देऊन काम करावे. मुलांना संगणक शिक्षण देणे खूप महत्त्वाचे आहे, यासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना संगणक हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये चांगली स्वच्छता ठेवावी. प्रत्येक रुग्णालयाला स्त्री प्रसुतीचे जे उद्दिष्ट दिले आहे ते पूर्ण करावे, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही मुख्यालय सोडू नये.
जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. या खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीएसआर फंडाचा वापर करावा. हा फंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी दिशा समितीच्या सदस्यांबरोबर अधिकाऱ्यांनीही प्रयत्न करावेत. केंद्र शासनाच्या ज्या योजना शेतकऱ्यांशी संबंधित आहेत, त्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिला पाहिजे. ज्या योजनांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावयाचा आहे, त्याबाबत लेखी माहिती द्यावी त्याचाही योग्य पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही खासदार श्री. भोसले यांनी या बैठकीत दिली.
या बैठकीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची जिल्ह्यातील कामे, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन आणि महावितरण यांच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.



