
जिल्हा महिला व बालविकास विभागाचे निर्देश
स्टार ११ महाराष्ट्र
सातारा (प्रतिनिधी): कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित कार्य वातावरण मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. ‘कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण, प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, २०१३’ नुसार सातारा जिल्ह्यातील १० किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत असलेल्या सर्व शासकीय, अर्धशासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती (ICC) स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
समितीची स्थापना झाल्यानंतर शासनाच्या अधिकृत ‘शी बॉक्स’ (SHe-Box) पोर्टलवर नोंदणी करणे आणि संबंधित समितीची संपूर्ण माहिती पोर्टलवर अद्यायावत करणे बंधनकारक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर, सातारा जिल्ह्यातील सर्व संबंधित कार्यालये व आस्थापनांच्या प्रमुखांनी आपल्या कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करून तातडीने ‘शी बॉक्स’ पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी आणि माहिती अद्यायावत करावी, असे आवाहन सातारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



