सामाजिक

गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे प्रशासन,पोलिसांचे मंडळांना आवाहन

परवानगी शिवाय मिरवणूक नाही; नियम मोडल्यास कठोर कारवाईचा इशारा

महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य,कडक कारवाईचा इशारा

मेढा,दि.०३.   गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यात उत्सव शांततेत,सुरळीत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावा यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. याच अनुषंगाने मेढा पोलीस स्टेशनच्या वतीने हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत बोलताना जावळीचे तहसीलदार प्रवीण मुदगुल यांनी उपस्थित मंडळ प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. गणेशोत्सव हा सर्वांचाच श्रद्धेचा उत्सव असून, तो साजरा करताना कोणत्याही मंडळाने नियमांकडे दुर्लक्ष करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व मंडळांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून परवानगी घेऊनच उत्सवाचे नियोजन करावे तसेच परिसरात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही,यादृष्टीने प्रत्येक मंडळाने स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मेढा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना संबोधित करताना मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनीही उत्सव शांततेत साजरा करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही,याची काळजी घेत उत्सव साजरा करावा, असे त्यांनी सांगितले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी डीजेच्या दणदणाटावर यंदाही पूर्ण बंदी असून,मिरवणुकांमध्ये केवळ पारंपरिक वाद्यांच्या तालावरच काढण्यात याव्या तसेच वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने कोणतीही मिरवणूक काढू नये,रस्त्याच्या कडेला अथवा वाहतुकीस अडथळादायक ठरणाऱ्या ठिकाणी गणपती मंडप अथवा शेड उभारू नये.स्थापनेपासून विसर्जनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर संबंधित विभागाची लेखी परवानगी घेणे बंधनकारकआहे. मंडळांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद,भांडण अथवा तंटा होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी.सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह,मजकूर टाकू नये अथवा तो व्हायरल करू नये.  गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे,असे निर्देश यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिले.


उत्सवाचा आनंद प्रत्येक नागरिकाला, विशेषतः महिला भगिनींना निर्भयपणे घेता यावा,यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.या बैठकीच्या निमित्ताने तालुक्यात उल्लेखनीय व विशेष कामगिरी बजावणाऱ्या पोलीस पाटलांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

या बैठकीस जावळीचे तहसीलदार प्रवीण मुदगुल, मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगटे,पोलीस हवालदार सुनील वाघमळे ओंकार दीक्षित यांच्यासह अनेक अधिकारी व तालुक्यातील मंडळाचे अध्यक्ष सदस्य,पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने दिलेल्या या सर्व सूचनांचे पालन करत, यंदाचा गणेशोत्सव जावली तालुक्यात भक्तिभावाने, आनंदाने साजरा व्हावा,अशी अपेक्षा प्रशासन व पोलीस यंत्रणेने व्यक्त केली आहेउपस्थित सर्वांचे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक विजय शिंगटे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!