क्राईम

खंडणी, धमकी अन् मारहाणीचे गुन्हे; अनमोल कांबळे दोन वर्षांसाठी तडीपार

हॉटेल व्यावसायिकांना बातमी प्रसिद्ध करण्याची आणि ॲट्रॉसिटीची धमकी देत पैशांची मागणी केल्याचा आरोप; पाचगणी पोलिसांची कारवाई

स्टार ११ महाराष्ट्र पाचगणी प्रतिनिधी –

पाचगणी.दि.०१. खंडणी मागणे, धमकावणे, मारहाण करणे तसेच शासकीय कामात अडथळा आणण्यासह विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याच्या प्रकरणांची नोंद असलेल्या पाचगणीतील अनमोल अशोक कांबळे (रा. सिद्धार्थनगर, पाचगणी) याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वाई डॉ. योगेश खरमाटे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. पाचगणी पोलिसांच्या प्रस्तावानंतर झालेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल कांबळे याच्याविरुद्ध सन २०२० ते २०२६ या कालावधीत खंडणी मागणे, धमकावणे, मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे आणि मानहानी करणे अशा स्वरूपाचे गुन्हे पाचगणी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, काही स्थानिक नागरिकांना हॉटेल किंवा इमारतीचे बांधकाम बेकायदेशीर असल्याची बातमी प्रसिद्ध करण्याची तसेच ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल करण्याची भीती दाखवून पैशांची मागणी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संबंधित नागरिकांनी सुरुवातीला भीतीपोटी तक्रार देण्याचे टाळले होते. मात्र, नंतर त्यांनी पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून आपली व्यथा मांडली. नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर त्यांनी लेखी जबाबही दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि परिसरातील नागरिकांना भयमुक्त वातावरणात राहता यावे, यासाठी पाचगणी पोलीस ठाण्याच्या वतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) व (ब) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, वाई यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभागाचे सुनील साळुंखे यांनी केली. त्यानंतर अनमोल कांबळे याला संपूर्ण सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आला.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी ही कारवाई प्रस्तावित केली. पुढील चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी केली.

दरम्यान, पाचगणी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, परिसरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने या कारवाईकडे पाहिले जात आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!