विशाळगडजवळ आढळली मांसाहारी गोगलगाईची नवीन प्रजात डॉ.अमृत भोसले,श्री तेजस ठाकरे,सातारचे डॉ.ओंकार यादव यांचे संशोधन

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
केळघर.दि.१३. विशाळगडजवळील जंगलात संशोधकांला मांसाहारी गोगलगाईची नवीन प्रजात आढळली आहे. सह्याद्रीमध्ये आढळल्यामुळे या गोगलगाईला सह्याद्रीएन्सिस असे नामकरण केले आहे.
मूळचे मिरज तालुक्यातील असलेले संशोधक डॉ. अमृत भोसले सध्या कऱ्हाडच्या सद्गुरु गाडगेमहाराज महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आणि त्यांच्यासोबत ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे श्री तेजस ठाकरे आणि राधानगरी तालुक्याचे डॉ. ओंकार यादव सध्या सातारा जिल्ह्यातील मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे यांना नुकत्याच जाहीर झालेल्या विशाळगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह वनक्षेत्रात आंब्याजवळ सप्टेंबर २०१७, ऑगस्ट २०२० आणि सप्टेंबर २०२० मध्ये या प्रजातीच्या गोगलगाई आढळल्या. त्यांना ही गोगलगाईची नवीन प्रजात असल्याचे लक्षात आले. यासंदर्भातील संशोधनपर प्रबंध १० जून रोजी ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय जर्नल मोल्युस्कन रिसर्चमध्ये प्रकाशित झाला आहे.
भारतामध्ये गोगलगायींच्या १,३०० ते १,४०० प्रजाती आढळून येतात. काही परदेशी प्रजातीही देशात आढळतात. पश्चिम घाटात गोगलगाईंच्या ६४ पोटजाती, २३ फॅमिली आणि २८० प्रजाती सापडतात. आंबा येथील नव्या प्रजातीमुळे ही संख्या आता २८१ झाली आहे. ही प्रजात हॅप्लॉप्टिकियस या स्ट्रेप्टॅक्सिड वंशातील आहे.
गोगलगाईंचा शंख हा कॅल्शियमचा मोठा स्रोत असतो. काही गोगलगाईंमध्ये नर आणि मादीचे लिंग हे एकाच जीवामध्ये असते. याला ’हर्माफ्रोडाइट्स’ असे म्हणतात. काही गोगलगाईंमध्ये दोन्ही लिंग स्वतंत्र असतात. काही गोगलगाई या मांसभक्षी असतात. आजबाजूच्या दुसर्या गोगलगाईंची शिकार करुन त्या खातात. शंखामध्ये शिरून त्या गोगलगाईंची शिकार करुन आपला उदरनिर्वाह करतात. काही गोगलगाई मृत जीवांवर अन्नग्रहण करतात. महाराष्ट्रात केवळ दोन मोठ्या मांसभक्षी प्रकाराच्या गोगलगाईच्या प्रजाती आढळतात. त्यामधील ’पेरोटेटिया राजेश गोपाली’ ही प्रजात वर्षापूर्वी राधानगरी अभयारण्यामधून शोधली होती.



