कास पठारावरच्या पर्यावरणपूरक सुविधांतून पर्यटनाला चालना मिळणार…….. ई-बस व बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
सातारा.दि. २२. सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार असून यासाठी चार ई-बसेसचे तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा तयार करणे, सुरक्षा वाढविणे तसेच, घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही करण्यात येईल मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

याप्रसंगी अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर, सहसंचालक धनंजय सावळकर उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीव्दारे सातारा येथून आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी आमदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, कास पठारावील प्रदूषण रोखण्यासाठी ई-बसची सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा शासनाचा चांगला निर्णय आहे. कास पठारावरील प्रदूषण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत व वन विभागाच्या वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिकच्या सुविधा मिळाव्या तसेच नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती करावी, यासाठी नेहमीच सहकार्य राहील,अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

कास पठारावरील फुले पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. येथील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ई-बस सेवा सुरु करण्यात येत आहे. ह्या ई – बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून उपलब्ध झाल्या आहेत. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षापासून अतिरिक्त ई-बसेसचे नियोजन केले जाईल. तसेच कास संवर्धनासाठी आणखी उपाययोजना केल्या जातील, असे जिल्हाधिकारी श्री.जयवंशी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

युनेस्कोने कास पठाराला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. हे स्थळ राखीव वन व जैवविविधतेचे भांडार असल्यामुळे येथील नैसर्गिक वनसंपत्तीचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पर्यटन विभाग पर्यावरणपूरक पर्यटन संकल्पनेंतर्गत या हंगामाकरिता चार ई-बसेस सुरु करत आहे. या बसेस कासने गावापासून कास पाठरापर्यंत अर्ध्या कि.मी.पर्यंत चालविण्यात येतील. यामुळे या परिसरात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणास आळा बसण्यास मदत होईल.
पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर सौंदर्याने बहरलेला असतो. या परिसरात ठोसेघरचा धबधबा, बामणोली येथे कोयना जलाशय, वासोटा किल्ला, सज्जनगड किल्ला अशी विविध पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन विभागच्या माध्यमातून बामणोली येथे नवीन जलक्रीडा केंद्र उभारण्यासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकंदरीत या संपूर्ण परिसरास एक एकात्मिक टुरिझम सर्किट विकसित करण्यात येईल आणि त्यातून या परिसरातील स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, तसेच आर्थिक विकासाला चालना दिली जाईल. आगामी काळात अशा अन्य पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुद्धा ई-बसेस सुरु करता येतील. त्या माध्यमातून पर्यटन विकासाबरोबर पर्यावरण रक्षणालाही प्राधान्य देण्यात येईल.




