
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज — अर्चना पवार
कुसुंबी प्रतिनिधी. दि.१६. जावली तालुक्यातील काळेश्वरी देवीसाठी प्रसिद्ध असणारे व कुसुंबी पंचायत समिती व जिल्हा परिषद गण व गटाच्या नावाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुसुंबी गावच्या ग्रामपंचायतीसाठी काट्याची टक्कर सुरू असून प्रचाराने आता वेग घेतला आहे.

कुसुंबी ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य असून तीन वाॅर्ड पैकी पद्यावती वाॅर्ड नंबर एक मधील तीन सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उरलेल्या काळेश्वरी वाॅर्ड व हनुमान वार्ड मधील सहा जागांसह लोकनियुक्त सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. या दोन वार्डसह सरपंच पदासाठी सत्ताधारी गटाचे काळेश्वरी देवी ग्रामविकास पॅनल तर विरोधकांचे काळेश्वरी देवी ग्रामविकास परिवर्तन पॅनल अशी टक्कर होत आहे.

सत्ताधारी गटाकडून कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्षपद भूषविलेले मारूती चिकणे (बापू) तर परिवर्तन पॅनल कडून सामाजिक कार्यकर्ते साधू चिकणे सरपंच पदासाठी नशीब अजमावत आहेत. दोन्ही गटाकडे सद्यस्थितीत समान पारडे दिसत आहे. परिवर्तन पॅनल कडून शंकर वेंदे (आप्पा), राजू चिकणे, राम कदम, देवेंद्र सुतार, रिपब्लिकन चे जिल्हाध्यक्ष संजय गाडे, गणपत वेंदे, ज्ञानदेव वेंदे, आनंदराव चिकणे, विठ्ठल चिकणे अशी गावातील मात्तबर मंडळी मेहनत घेताना दिसत आहेत तर सत्ताधारी पॅनल कडून माजी सरपंच जगन्नाथ चिकणे, काळेश्वरी ट्रस्टचे किसन चिकणे, यदु चिकणे, संतोष चिकने, भगवान आखाडे, राजू कोकरे, लक्ष्मण आखाडे, ज्ञानेश्वर आखाडे, सोपान चिकणे, नामदेव चिकणे, आनंदा चिकणे, राजेंद्र वेंदे, संतोष शंकर चिकने, सुरेश माने, रविंद्र माने, विलास माने, गोरख वेंदे, शंकर विठ्ठल वेंदे, रामदास वेंदे आदी मंडळी आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
वाड्या वस्त्यांमधे विभागलेल्या कुसुंबी ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र मोठे आहे. त्यामुळे येथील मतदार नेमके कोणाला संधी देतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. सद्यस्थितीत कोणत्याही राजकीय पक्षाचा बॅनर न लावता निवडणूक होत असली तरी सत्ताधारी गट आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व माननारा असून परिवर्तन पॅनल महाविकास आघाडीसह माजी सभापती अमित कदम यांचे नेतृत्व माननारे आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराला रंगत आली असून निवडणूक अटीतटीची होणार आहे.
मुंबईकरांचा कल ठरणार निर्णायक…
रोजगार धंद्यासाठी मुंबईत असलेल्या तरुण व इतर मतदारांची संख्या मोठी असून हे मतदार कोणाच्या पाठीमागे राहतात यावर दोन्ही पॅनलचे भवितव्य ठरणार असून सुशिक्षित, विचार करणारी मुंबईकर मंडळी यांची भूमिका निर्णय ठरणार आहे.

साधू चिकणे (सरपंच पदासाठी उमेदवार)
ग्रामविकास परिवर्तन पॅनल

मारुती चिकणे (सरपंच पदासाठी उमेदवार)
काळेश्वरी देवी ग्रामविकास पॅनल



