महाराष्ट्र

निसर्गाचा प्रकोप हातात नाही, पण व्यसनमुक्त राहणे आपल्या हातात..

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ

केळघर.दि.०३ जावली तालुक्यातील वाहिटे येथिल अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या दगड-मातीने मुजलेल्या विहीरी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने मशिनच्या सहाय्याने काढून देण्याच्या कार्याच्या समारोप प्रसंगी बोलताना बंडातात्या कराडकर म्हणाले काही गोष्टी माणसाच्या हातात नसतात त्या थांबविणे शक्य होत नाही. जसे की निसर्गाचा प्रकोप आपण थांबवू शकत नाही पण माणसांच्या जीवनात व्यसनाधिनतेचा वाढणारा प्रकोप थांबविणे मात्र हातात आहे. तो थांबविणे हीच काळाची गरज आहे.
२२ व २३ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे केळघर भागातील गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.इथल्या शेतकर्‍यांच्या शेती व विहीरींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावांपैकी वाहिटे गावातील शेतकर्‍यांना विहीरी काढून देण्याचा शब्द बंडातात्या कराडकर यांनी मदत वाटप प्रसंगी दिला होता.वाहिटे गावातील ९ विहीरी पुर्ववत करून देण्याचे काम व्यसनमुक्त युवक संघाने पूर्ण केले. या कामाच्या समारोप प्रसंगी बंडातात्या कराडकर, विलासबाबा जवळ,अध्यक्ष दिपक जाधव,प्रविणशेठ वाघ, माउली आरोटे,नितीन माने यांचेसह व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना वाहिटे गावचे सरपंच श्री राजाराम जांभळे म्हणाले बंडातात्या व व्यसनमुक्त युवक संघाने केलेली मदत आम्ही ग्रामस्थ कधिही विसरू शकत नाही.आता उन्हाळी पिके घेतल्याने शेतकर्‍यांना नक्कीच फायदा होईल.हे काम आम्ही करायचे असते तर ४०लाखानेही झाले नसते.
बंडातात्या कराडकर यावेळी म्हणाले खरतरं हे काम लवकर सुरू करायचे होते पण पाऊस थांबल्याशिवाय करणे अशक्य होते.आजही समाजामधे चांगूलपणा निश्चित आहे. संकट काळात लोकं एकमेकांना मदत करीत आहेत म्हणूनच व्यसनमुक्त युवक संघाला अतिवृष्टी ग्रस्तांना ३२ टन धान्य व ७ लाख रूपयांची जीवनावश्यक किट देता आली. आम्ही फक्त पोष्टमनची भूमिका बजावली आहे. विहीरी काढण्यासाठी आमचे कार्यकर्ते कल्याण तावरे बारामती यांनी फाॅकलेन मशिन दिले तर डिझेलची मदत कोरेगावचे आमदार महेशदादा शिंदे यांनी केल्याने आपल्या विहीरी काढण्याचे काम वेगात पूर्ण करता आले. यापुढेही समाजाचे दुःख हलके करण्यासाठी आपल्या गावच्या शक्तीदेवतेने व्यसनमुक्त संघाला शक्ती द्यावी अशी प्रार्थनाही केली.
यावेळी विलासबाबा जवळ यांचेसह अनेकांनी मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!