सातारा जिल्ह्यातील ७ नगरपरिषदा व १ नगरपंचायतींसाठी ३७४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार

स्टार ११ महाराष्ट्र
२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान तर ३ डिसेंबर २०२५ मतमोजणी
सातारा दि.१. निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केलेला असून त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, मलकापूर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई या ७ नगरपरिषदा व मेढा या १ नगरपंचायत अशा एकूण ८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पार पाडली जाणार आहे तर मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून सुरु होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यात या ८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांत एकूण मतदान केंद्रांवर ३७४ मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार असून यासाठी केंद्राध्यक्ष,सहायक केंद्रांध्यक्ष शिपाई, पोलीस कर्मचारी असे एकूण कर्मचारी २३५२ मतदान केंद्रावर निवडणूककामी नेमण्यात आलेले आहेत. तसेच एकूण ५४ झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
सातारा नगरपरिषदेने महिलांसाठी आणि दिव्यांगासाठी एक विशेष मतदान केंद्र तयार केले असून बांबू संकल्पनेवर २ व भारतीय सैन्य दलाच्या संकल्पनेवर १ विशेष मतदान केंद्र बनविले आहे. वाई नगरपरिषदेने महिलांसाठी आणि दिव्यांगासाठी एक विशेष मतदान केंद्र तयार केले आहे, म्हसवड नगरपरिषदेने महिलांसाठी एक विशेष मतदान केंद्र तयार केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, मलकापूर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई या ७ नगरपरिषदा व मेढा या १ नगरपंचायत अशा एकूण ८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची मतमोजणीची प्रक्रिया सकाळी १०.०० वाजलेपासून सुरु होणार आहे.
या कालावधीत संबंधीत उमेदवार, राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे इ. यांच्याकडून नियमाचे उल्लंघन होणार नाही यांची दक्षता घेवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी. तसेच सर्व मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होवून मतदानाचा हक्क बजवावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.



