
महाबळेश्वर,पाचगणी वाहतूक बदलाबाबत पोलिस प्रशासनाकडून सुचना जाहीर
स्टार ११ महाराष्ट्र
महाबळेश्वर.दि.२७. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.या निमित्ताने महाबळेश्वर पाचगणी कडे येणाऱ्या वाहतुकीत जिल्हा पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

पर्यटन महोत्सव कालावधीत महाबळेश्वर येथील गोल्फ ग्राऊड महाबळेश्वर, माखरीया हायस्कुल, माखरीया गार्डन, प्रतापसिह गार्डन, वेण्णा लेक, क्षेत्रमहाबळेश्वर तापोळा, तसेच पांचगणी पोलीस ठाणे हद्दीतील भोसे, पांचगणी, तळमाळ पांचगणी, थापा दांडेघर या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे अयोजन केले असून या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवास राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणावर येणार असून सदर कालावधीत व्ही. व्ही. आयपी व व्हीआयपी हे सुध्दा पर्यटन महोत्सव कार्यक्रमास भेट देणार आहेत.

महाबळेश्वर-पांचगणी रोड अतिशय अरुंद असल्याने व घाट रस्ता असल्याने मोठया प्रमाणात वाहनांची गर्दी व वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने महोत्सव कालावधीत वाई बाजुकडुन पांचगणी महाबळेश्वरकडे जाणा-या व महाबळेश्वर –पांचगणी बाजूकडुन वाई/सातारा बाजूकडे जाणा-या नागरीकांची/वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणुन दि.०२/०५/२०२५ ते ०४/०५/२०२५ या कालावधीत वाहनांच्या बाबतीत खालीलप्रमाणे वाहतुकीचे नियोजन होणे आवश्यक आहे. त्याबाबतची अधिसुचना प्रसिद्ध करणेत येत आहे.

अपर पोलीस अधीक्षक, सातारा डॉ. वैशाली कडुकर यांनी महाबळेश्वर पोलीस ठाणे हद्दीत महाबळेश्वर पर्यटन महोत्सव आयोजीत करण्यात आलेला आहे. या कालावधीत महाबळेश्वर येथे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल करुन वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्याकरीता दि. ०२/०५/२०२५ चे पासुन दि. ०४/०५/२०२५ पर्यत खालील अधिसुचना पारित केली आहे.

वाहनांच्या वाहतुक मार्गातील बदलाबाबत -वाहतुक मार्गातील बदल खालीलप्रमाणे करणेत आला आहे.-
१. मुंबई पुणे वाई बाजूकडुन येणारी सर्व प्रकारची वाहतुक ही वाई (पसरणी घाट) मार्गे पांचगणी व महाबळेश्वर कडे जाईल. सदरच्या मार्गावर एकेरी वाहतुक राहील.
२. महाबळेश्वर वरुन मुंबई पुणे कुडाळ – पाचवड वरुन पुणे वाई बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही महाबळेश्वर – मेढा बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाकडे जाईल.
३. महाबळेश्वर वरुन भिलार पांचगणी बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही महाबळेश्वर उदय हॉटेल चौक आर आर कॉटेज चौक क्षेत्रमहाबळेश्वर नाका मार्गे अवकाळी अशी जाईल. सदरच्या मार्गावर एकेरी वाहतुक राहील.
४. महाबळेश्वर वरुन वेण्णा लेक करीता जाणारी वाहतुक ही महाबळेश्वर मार्केट आर आर कॉटेज चौक – क्षेत्रमहाबळेश्वर नाका नाकिंदा फाटा-मार्गे वेण्णा लेक कडे जाईल. सदरच्या मार्गावर एकेरी वाहतुक राहील.
५. महाबळेश्वर वरुन सातारा, सांगली बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही महाबळेश्वर – मेढा -सातारा मार्गे पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन सांगलीकडे जाईल.

वरील प्रमाणे वाहतुक ज्या-ज्या ठिकाणावरुन वळविण्यात आली आहे अशा सर्व ठिकाणी दिशा दर्शक फलक व पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतुक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे.वाहतूक, कायदा व सुव्यवस्था अंत्यत उत्कृष्ट राहील याबाबत काटेकोर दक्षता घ्यावी. अश्या सुचना अप्पर पोलीस अधीक्षक,डॉ.वैशाली कडुकर यांनी दिल्या आहेत.