सातारासामाजिक

पोलीस पाटील सुहास भोसले यांचा विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्काराने सन्मान

स्टार ११ महाराष्ट्र

  

मेढा.दि.०१.
राज्यपालांच्या वतीने देण्यात येणारा पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार या राज्यस्तरीय पुरस्काराने जावली तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ गावचे सुपुत्र व पोलिस पाटील सुहास हणमंतराव भोसले यांना सन्मानित करण्यात आले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख २५ हजार रुपये देऊन गौरवण्यात आले. यावेळी ना. शंभूराज देसाई यांनी सुहास भोसले यांना मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार संपूर्ण पोलीस पाटील यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे गौरवोद्गार काढले.

महाराष्ट्र दिनी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात हा सोहळा पार पडला.यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडू पाटील, पोलीस उपाधीक्षक (गृह) सबनीस तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले.

सुहास भोसले यांनी महसूल, पोलीस प्रशासन व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे. त्याची दखल घेऊन या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.
सुहास भोसले यांनी पोलिस पाटील म्हणून संपूर्ण जिल्ह्यात वेगळा ठसा उमटवला आहे. जावली तालुक्यात त्यांनी महिगाव, दुदुस्करवाडी, नरफदेव (मेरुलिंग) या गावांचा चार्ज उत्कृष्टरित्या सांभाळला. कोरोना योद्धा म्हणून त्यांनी केलेले काम पोलिस पाटील यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. पोलिस व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याची त्यांची हातोटी त्यांना पुरस्कार देऊन गेली.

खर्शी तर्फ कुडाळ गावांत पोलिस पाटील म्हणून काम करताना त्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच गावच्या व सायगाव विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व तळमळीतून त्यांनी तमाम पोलीस पाटलांसाठी आयडॉल असे काम केले आहे. सामाजिक कार्यात ते हिरीरीने सहभागी होत असून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांचा मदतीचा हात कायमच पुढे असतो.

शासन स्तरावर त्यांच्या कार्याची दखल यापूर्वीही अनेकदा घेण्यात आली आहे. महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सुहास भोसले यापूर्वीही सन्मानित झाले आहेत. तालुका व जिल्हा स्तरावर यापूर्वीही २५ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. आता राज्यस्तरीय पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार त्यांना मिळाल्याने सातारा जिल्ह्यातील तमाम पोलीस पाटलांची मान उंचावली असून संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या पुरस्काराबद्दल त्यांचे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्ह्यातील तसेच राजकीय सामाजिक मान्यवर,ग्रामस्थ आदींनी सुहास भोसले यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!