जावली तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेली शेतजमीनची दुरुस्तीचा आजपासून उत्साहात प्रारंभ

मेढा दि.१४ जावली तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतजमिनीच्या दुरुस्तीचा शुभारंभ आज विविध मान्यवर आणि शासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला.
आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदेव रांजणे आणि नाम फौंडेशन यांच्या सहकार्याने मेढा येथील पोलीस परेड ग्राऊंडवर जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर ट्रॉली आदी सामुग्री बाधित गावोगावी सुपूर्त करण्याचा शुभारंभ याप्रसंगी करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मेढ्याचे नगराध्यक्ष पांडूरंग जवळ, कांतीभाई देशमुख, विजय सुतार, हरिभाऊ शेलार, तुकाराम धनावडे, शांताराम पार्टे, नाना जांभळे, समीर आतार, केळघर व मेढा विभागातील सरपंच, ग्रामस्थ मोठया संख्येंने उपस्थित होते. जावली तालुक्यातील केळघर विभागातील ज्या गावांचे अतिवृष्टीत जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या गावातील नदीकाठच्या जमिनी व गावातील डोंगर पायथ्याच्या जमिनीची दुरूस्ती प्राधान्याने करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी कसल्याही प्रकारची अडचण आल्यास तहसिलदार व पदाधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

तहसिलदार राजेंद्र पोळ म्हणाले, आपण हे शेतजमीन पुर्ववत करण्याचे हाती घेतलेले काम तसे खुप अवघड व अडचणीचे असले तरी प्रत्येक गावाच्या सहकार्यातून हे काम मार्गी लावण्याचा आम्ही प्रशासन म्हनून प्रयत्नशील आहोत. जिथ जास्त अडचण असेल तिथं ग्रामस्थांच्या चर्चेतून प्रश्न मार्गी लावू. फक्त हे चालू राहणारे काम थांबवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यास अडचणी निर्माण होतील.श्री.सागर धनावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



