धार्मिकसातारा

कोरोनाच्या निर्बंधांमुळे जावली तालुक्यातील कुसूंबीच्या काळेश्वरी देवीची यात्रा या वर्षी देखील होणार रद्द …

फोटो : कुसुंबीची काळूबाई देवी

मेढा दि.१३: राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जावली तालुक्यातील कुसुंबीच्या काळेश्वरी देवीची यात्रा यावर्षी सुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत प्रशासन, काळेश्वरी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती काळेश्वरी देवी ट्रस्ट यांच्याकडून देण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या सावटामुळे राज्यात अनेक ठिकाणच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. जावली तालुक्यातील कुसूंबीच्या काळेश्वरी देवीची यात्रा देखील दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भरत असते. या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक गर्दी करत असतात. मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे यावर्षीही यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासन व ट्रस्ट यांच्याकडून घेण्यात आला आहे. यावर्षी यात्रा ही अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार असून बुधवार दि. १६ रोजी देवीची ध्वजकाठी उभारून फक्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत यात्रेला प्रारंभ होणार आहे. शुक्रवारी देवीचा रुद्राभिषेक सकाळी ०७.०० वाजता संपन्न होणार असून शनिवारी जागर व रविवारी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे.


तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीनुसार यात्रेतील धार्मिक विधी, पूजाविधी रूढी परंपरेनुसार ट्रस्टचे विश्वस्त, पुजारी व मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार आहेत. दरम्यान यावेळी झालेल्या बैठकीसाठी तहसीलदार राजेंद्र पोळ, कुसूंबी सरपंच पुष्पा चिकणे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामदास वेंदे, विश्वस्त बाजीराव चिकणे, तुकाराम चिकणे, ग्रामस्थ जगन्नाथ चिकणे, राजू चिकणे, नामदेव चिकणे, प्रतीक चिकणे, जितीन वेंदे, अर्जुन चिकणे तसेच ग्रामस्थ व प्रशासकीय पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!