पत्रकाराला फोनवरून धमकी दिल्याने पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जावली तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज — युवराज धुमाळ
मेढा. दि.०२ जावली तालुक्यातील कुडाळ येथील दै पुढारीचे पत्रकार प्रसन्न पवार यांना तू अवैध दारू धंद्याची बातमी का दिलीस याचे परिणाम गंभीर होतील अशी अज्ञात इसमाने धमकी दिली होती. यावर मेढा पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता.मात्र जावली तालुका पत्रकार संघाच्या रेट्याने जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे व सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह जावली पत्रकार संघाचे अध्यक्ष शशिकांत गुरव व सदस्य पत्रकारांनी जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांची भेट घेऊन पत्रकार हल्ला संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार अज्ञात इसमावर पत्रकार हल्ला संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की 19 नोव्हेंबरला रात्री सात वाजून 52 मिनिटांनी पत्रकार प्रसन्न पवार यांना अज्ञात इसमाने फोन करून तु बातमी लावतोयस याचे वाइट परिणाम तुला पुढील काळात भोगावे व पाहायला मिळतील अशी धमकी दिली होती. तसेच रविवारी 20 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेअकरा वाजता पुन्हा एकदा अज्ञात फोनवरून तू केस का दिलीस, माघारी घे.. आम्ही काय पोलीस स्टेशनला जाणार नाही असा परत दमदाटी करण्याचा प्रकार घडला आहे.

त्यामुळे जावली तालुका पत्रकार संघाच्या रेट्याने जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे व सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना भेटून अज्ञात इसमावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार मेढा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीवर महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 2017) नुसार कलम तीन,कलम चार अन्वे व भारतीय दंड संहिता 1960 नुसार कलम 507 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास कुडाळ पोलीस स्टेशनचे हवालदार रफिक शेख करत आहेत.
जावली तालुका पत्रकार संघातील पत्रकार हे उत्कृष्ट काम करत असतात. आम्ही विनाकारण कोणाच्या वाटेला जात नाही.मात्र आमच्या जर कोणी वाटेला गेलं तर आम्ही गप्प बसणार नाही.प्रसन्न पवार यांनी पोलिसांनी अवैध दारू धंद्यांवर कारवाई केल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. ती माहिती पत्रकारांना पोलीस देत असतात असं असताना अज्ञात व्यक्तीने पवार यांना धमकी दिली आहे.या धमकी मागचा सूत्रधार शोधल्याशिवाय व त्यालाही गजाआड केल्याशिवाय आम्ही पत्रकार गप्प बसणार नाही. यापुढे जावली तालुक्यातील कोणत्याही पत्रकाराला कोणी आर कार केलं तर ते सहन केले जाणार नाही.आता पत्रकार संघाच्या वतीने अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडणार आहोत.
शशिकांत गुरव
अध्यक्ष,जावली तालुका पत्रकार संघ



