
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
मेढा.दि.०३.ABP माझाचे प्रतिनिधी पत्रकार राहुल तपासे यांच्यावर हल्ला करणाऱ्या नीच प्रवृतींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जावली तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली असून या भ्याड हल्ल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करून हल्लेखोरांचा निषेध केला आहे.
याबाबत जावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शशिकांत गुरव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पत्रकार राहुल तपासे हे परखड, समाजशील पत्रकारितेसाठी जगभरातील मराठी भाषिकांमध्ये परिचित आहेत. पत्रकारिता हे जेवढे अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे माध्यम आहे तितकेच ते अनेक सकारात्मक गोष्टींना बळ देण्याचे व्यासपीठ आहे, हे त्यांनी कितीतरी वार्तांकनातून सिद्ध केले आहे. या आमच्या तरुण मित्राने अत्यंत कष्टातून वाटचाल करत निस्पृह, प्रामाणिक, चारित्र्यवान पत्रकारिता केली आहे. त्यामुळे या मित्रावर झालेला हल्ला अत्यंत संतापजनक आहे. आम्ही संविधानाला मानतो अन्यथा या हल्लेखोरांचा समाचार आम्हीच घेतला असता, त्यासाठी किंचितसा वेळ लागला नसता.
राहुल तपासे हे पोलीस मित्र पुरस्कार प्राप्त आहेत याची जाणीव ठेवून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. याबाबत पोलीस दल हयगय करणार नाही असा विश्वास आहे. त्यामुळे आमचा हा विश्वास सार्थ ठरवत कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई होईल .जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, पत्रकार संघाचे नेते विनोद कुलकर्णी , दीपक प्रभावळकर, शरद काटकर यांनी लक्ष घालून पत्रकार संरक्षण कायद्यान्वये हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करावा अशीही मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे
या निवेदनात अध्यक्ष शशिकांत गुरव, उपाध्यक्ष सुर्यकांत पवार, सचिव धनंजय गोरे जेष्ठ पत्रकार नारायणराव शिंगटे, सुरेश पार्टे,संजय दळवी,मोहन जगताप, विजय सपकाळ, संदीप गाडवे,सहसचिव नारायण जाधव,रवी गावडे,नंदू गाडगीळ, रघुनाथ पार्टे,भास्कर धनावडे, प्रशांत गुजर,निलेश शिंदे,सोमनाथ साखरे,अभिजीत शिंगटे,विश्वनाथ डिगे,युवराज धुमाळ,बळवंत पाडळे, बजरंग चौधरी आदी पत्रकारांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.



