
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – सुनिल धनावडे
मेढा प्रतिनिधी :- छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या मामुर्डी नगरीत शनिवार दिनांक ०६/०८/२०२२ रोजी मेढा केंद्राची शिक्षण परिषद आय एस ओ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथे मेढा केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ अलका संकपाळ मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
शिक्षण परिषदेची सुरुवात मामुर्डी शाळेतील बालचमूंनी गायन केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने अतिशय प्रसन्न व उत्साहवर्धक वातावरणात झाली.
शिक्षणपरिषदेचे सूत्रसंचालन श्री. आनंदा शेलार सर मामुर्डी यांनी केले तसेच श्री. सुरेश धनावडे सर मामुर्डी यांनी उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.
शिक्षण परिषदेतील विषयांची सुरुवात दिवदेववाडीच्या उपशिक्षिका सौ. शुभांगी मोहिते मॅडम यांनी केली. चालू शैक्षणिक वर्षातील अतिशय महत्वाचा विषय म्हणजे निपुण भारत अभियान – त्याची पार्श्वभूमी, गरज, महत्व व शासन स्तरावरील प्रयत्न, स्वरूप, ध्येय, अध्ययन निष्पत्ती त्याबाबतीत असणारी शिक्षकाची भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
नवीन शैक्षणिक धोरण २०२० तसेच FLN बाबत GR, विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीनुसार अध्ययन अध्यापन क्षमता कशा प्राप्त करता येतील ते सांगण्यात आले. निपुण अभियानाचा भाग म्हणजे शिकू आनंदे, कृतिपुस्तिका, मैत्री गणिताशी, शाळापूर्व तयारी अभियान याबाबत सखोल माहिती दिली तसेच विकासात्मक ध्येये समजावून सांगितली व CRG सदस्यांचे उद्बोधन सत्र मध्यवर्ती ठिकाण निश्चित करून घ्यावे हे सांगण्यात आले.श्री.अजित राक्षे सर शाळा मोहाट यांनी अतिशय सोप्या व ओघवत्या शब्दात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मिशन त्याचा हेतू तसेच भाषा व गणित घटक ध्येय अनेक उदा. व दाखले देऊन स्पष्ट केले. भाषिक सौंदर्याच्या दृष्टीने लेखनासाठी वाचन शब्दसंपत्ती वाढवणे गरजेचे असल्याने विद्यार्थ्यांना FLN कौशल्य कशाप्रकारे प्राप्त करता येतील व शिक्षकांनी सुलभकाचे काम करून ते कसे साध्य करावे याबाबत सखोल मार्गदशन केले.सौ.योगिता मापारी मॅडम शाळा मेढा यांनी शाळापूर्व तयारी विद्याप्रवेश पहिले पाऊल याबाबत अतिशय ओघवत्या भाषेत माहिती दिली.
विद्याप्रवेश कार्यक्रम हा निपुण भारतअंतर्गत असून अनौपचारिक वातावरणातून औपचारिक वातावरणात मूल येताना खेळ, गाणी, गोष्टी व कृतिवर आधारीत अध्यापनाविषयी मार्गदर्शन केले. विद्याप्रवेश अंतर्गत ९ घटकांचा समावेश आहे मुलांच्या स्वागतापासून ते संध्याकाळच्या निरोपापर्यंत दिवसभरात घ्यावयाच्या कृतींची मालिका दिलेली आहे. १२ आठवड्याचे नियोजन तसेच ४ आठवड्यानंतर मूल्यमापन करण्याविषयी मार्गदशन केले. प्रत्येक आठवड्याला पालकसभा घेऊन विद्यार्थ्यांची प्रगती व पालकांची मदत याबाबतही सखोल माहिती दिली.
सौ. शशिकला शिंगटे मॅडम शाळा करंजे यांनी निपुण भारत अभियान परिणामकारक अंमल बजावणीसाठी अध्ययन अध्यापनात विविध प्रकारचे लेखी साहित्य तसेच इतर इ साहित्य कशाप्रकारे वापरता येईल याबाबत माहिती दिली. जर मुले वाचायला शिकली तर ती शिकण्यासाठी वाचतील यासाठी विविध शैक्षणिक साहित्याचा म्हणजेच अध्ययन समृद्धी कार्यक्रमातील मराठी व गणित पेटीतील साहित्य, इंग्रजी पेटीतील साहित्य तसेच निपुण भारत अंतर्गत विविध कृतिपत्रिका, कृतिपुस्तिका, करूया मैत्री गणिताशी, Diksha aap चा प्रभावी वापर e-test, you tube वरील शैक्षणिक व्हिडिओचा वापर करून विद्यार्थ्यांना घटक समजावून देणे व स्वतःहून विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रवृत्त करण्याबाबत सांगण्यात आले.
श्री.नंदकुमार शिंदे वरिष्ठ मुख्याध्यापक शाळा मेढा यांनी विविध भागधारकांची भूमिका पालक व समाज सहभाग याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थीना शिकताना येणाऱ्याअडचणी व त्यावरील उपाय योजना स्पष्ट केल्या. विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी
पालक व समाजाचा सक्रिय सहभाग तसेच व्यवस्थापन समिती, माता पालकांचा सहभाग कसा घेता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. श्री. खराडे सरांनी गुरु नेव्हिगेटर app चा वापर याबाबत मार्गदर्शन केले.
सौ. ज्योती दिघे मॅडम शाळा पिंपरी यांनी FLN अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया याबाबत माहिती दिली. अध्ययन निष्पत्तीवर आधारीत मूल्यमापन यामध्ये – १) राष्ट्रीय व राज्यस्तरीय मूल्यांकन २ ) FLN पायाभूत अध्ययन अभ्यास ३) पायाभूत चाचणी – २०२२ ऑगस्ट मध्ये होणार आहे ४) राज्य स्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणाबाबत माहिती देण्यात आली. पायाभूत चाचणी इ.२री ते इ. ५ वी पर्यंतच्या वर्गांची ऑगस्ट २०२२ मध्ये होणार आहे तसेच राज्यअध्ययन संपादणूक सर्व्हेक्षण
(SLAS) 2022 मध्ये इ.३री, ५वी, ८वी या वर्गाची चाचणी डिसेंबर २०२२ मध्ये नियोजित करण्यात आली आहे यात भाषा व गणित विषयाचा समावेश आहे. अशा प्रकारे सर्व नियोजित मूल्यमापनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.श्री. सुरेश शेलार सर शाळा मेढा यांनी निपुण भारत विषयाबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले व त्याविषयीची प्रतिज्ञा सर्व उपस्थित शिक्षकांसमवेत घेण्यात आली.
श्री.अमोल गोरे सर शाळा चोरांबे यांनी चालू महिन्यातील SMC बैठक व त्यातील महत्वाचे विषय तसेच दि. ८ ऑगस्टपासून राबवण्यात विविध उपक्रमातील पालक व SMC सहभाग याबाबत सांगण्यात आले. ग्रामपंचायतीकडून शाळेला आवश्यक असणारे साहित्य कोणते आहे ते SMC च्या प्रयत्नातून मिळवावे तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता विविध माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचवावी. अशा सर्व विषयांच्या अनुशंगाने सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
आदरणीय केंद्रप्रमुख सौ. अलका संकपाळ मॅडम यांनी विविध प्रशासकीय विषयाबाबत माहिती देऊन त्याचा आढावा घेण्यात आला. सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत मामर्डी चे सरपंच जगन्नाथ राऊ धनावडे व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ लक्ष्मी ताई जाधव व सदस्य उपस्थीत होते.श्री.धोंडीबा मोरे गुरुजी शाळा मामुर्डी यांनी सर्व उपस्थित शिक्षक व मार्गदर्शक यांचे अतिशय गोड शब्दसुमनांनी आभार मानले व शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.



