कृषीजावली

समाधानकारक पाऊस झाला असल्यामुळे खरीप हंगामाच्या ७० % पेरण्या पूर्ण

स्टार 11 महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ——

केळघर. दि .२१ . जावळी तालुक्यात बहुतांशी भागात जोरदार प्रमाणात नसला तरी समाधानकारक पाऊस झाला असल्यामुळे खरीप हंगामाच्या ७० % पेरण्या पूर्ण झाल्या असून तालुक्याचे मुख्य पीक असलेल्या भात लावणीला मात्र वेग आला आहे. या आठवड्यात बहुतांश भात लावणी पूर्ण होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र शेतकरी वर्गासह जावळी तालुक्यात अजूनही जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत जावळीकर आहेत.

जावळी तालुक्याचे ५० हजार १७४ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून यापैकी २४ हजार ४२५ हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे.तालुक्यात खरीप पिकाचे २० हजार ६४३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे.१५जुलै अखेर सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्रात भात, ज्वारी, मका,उडीद, भुईमूग, सोयाबीन, ऊस लागवड झाली आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान १६०३ मिलीमीटर आहे.चारी बाजूने डोंगराळ व अति पर्जन्यमान असलेल्या जावळी तालुक्यात यावर्षी मात्र अद्यापही म्हणावा तसा पाऊस झाला नाही.त्यातच सुरवातीला मान्सूनपूर्व पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकऱ्यांना पेरण्या वेळेत करता आल्या नाहीत. त्यामुळे पेरणीचे क्षेत्र कमी झाले.

तालुक्यातील बामणोली, केळघर, यासह कुडाळ,करहर परिसरात भात पिकाबरोबरच वरी नाचणीचेही पीक घेतले जाते. मात्र यावर्षी तालुक्यात नाचणीची लागण अत्यल्प प्रमाणात झाली. तालुक्यात भात पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सर्वसाधारणपणे ८०००हेक्टरमध्ये भाताचे पीक घेतले जात असून, यामध्ये लागण पद्धतीचे ( जपानी पद्धत ) , चारसुत्री पध्दतीने भातपिक मोठ्या प्रमाणावर केले जाते. पावसाने ओढ दिल्यामुळे लांबणीवर पडलेल्या भात लावणीचे काम युद्ध पातळीवर सुरु असून भात लागण अंतिम टप्प्यात आहे. तालुक्यात इतर पिकांचेही वातावरण समाधानकारक आहे.भुईमूग, सोयाबीन, उडीद व इतर कडधान्ये ,हायब्रीड पिकांची समाधानकारक परिस्थिती आहे.

तालुक्यात सेंद्रीय शेतीबरोबरचआधुनिक खतांचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. एकंदरीत तालुक्यात पाऊस समाधानकारक झाला असला तरीही अजून जोरदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत असून तालुक्यात मुख्य पीक असंलेल्या भातलागण शेवटच्या टप्प्यात वेगात सुरु आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!