
स्टार ११महाराष्ट्र न्युज ——
थकबाकी वसुलीसाठी राबविणार विशेष मोहीम
मेढा. दि.०८.: महावितरणकडून थकीत वीजबिल वसुलीची मोहीम सुरू झाली असून पुढील काळात ही मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपली थकीत विजबिले लवकरात लवकर भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरण वाई विभागाचे कार्यकारी अभियंता अमित बोकील केले आहे. मार्चएन्ड वसूलीच्या दृष्टीने मेढा येथे जनमित्रांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
मेढा उपविभागीय कार्यालयांतर्गत आनेवाडी, करहर, मेढा, कुडाळ, तापोळा या शाखा येत असून या शाखांतर्गत असणाऱ्या थकीत विजबिल ग्राहकांची संख्या ६ हजार ५०० पेक्षा जास्त असून थकीत बिलांची रक्कम ३७ लाखांपेक्षा जास्त आहे.
या वीजबिल वसुलीसाठी ता.(०८) पासून पुढील तीन दिवस विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
महावितरणच्या थकीत वीजग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून ही थकबाकी आटोक्यात यावी याकरिता महावितरणकडून सध्या थकीत वीजबिल वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्या महावितरणच्या अनेक वीजग्राहकांची विजबिले हि थकीत असून यात घरगुती, औद्योगिक तसेच वाणिज्यिक वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे. सध्या मार्च महिना जवळ येत असून आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने थकीत विजबिलांची वसुली करणे हे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महत्वाचे बनले आहे.
थकबाकी वसुली मोहिमेदरम्यान थकीत ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे थकीत ग्राहकांनी आपली विजबिले वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन वाई विभागाचे कार्यकारी अभियंता अमित बोकील यांनी केले आहे. यावेळी झालेल्या बैठकीसाठी मेढा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे, शाखा अभियंता सुरेश कुंभार, अतुल सुतार, पवन राठोड, गणेश जाधव, ओमकार पाटील यांच्यासह जनमित्र उपस्थित होते.