
स्टार ११महाराष्ट्र
३० सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी
सातारा:दि.०९.सातारा शहरातील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या या कामामुळे मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, सातारा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३४ नुसार महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, १० जुलै २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सदर मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
काँक्रिटीकरणाच्या कामासाठी रस्त्याची एकच मार्गिका उपलब्ध असल्याने, तेथे अवजड वाहनांची ये-जा करणे धोकादायक ठरत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होऊन वादावादीचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी या मार्गावर अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
या वाहनांना बंदी (१० जुलै ते ३० सप्टेंबर):
पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट आणि बॉम्बे रेस्टॉरंट ते पोवई नाका या दोन्ही दिशांनी येणाऱ्या सर्व एस.टी. बसेस, ट्रक, डंपर, कंटेनर, ट्रॅक्टर आणि इतर सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना या मार्गावरून प्रवेश बंद करण्यात आला आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग:
- शहराबाहेर जाणारी वाहने: सातारा मध्यवर्ती बसस्थानकावरून सुटणाऱ्या मुंबई, पुणे, कोरेगाव, सोलापूर मार्गावरील एस.टी. बसेस तसेच अवजड वाहने ही ‘जुनी जिल्हा मध्यवर्ती बँक – पोलीस परेड मैदान – पारंगे चौक – जुना आर.टी.ओ. चौक – वाढे फाटा’ या मार्गाने शहराबाहेर जातील.
- शहरात येणारी वाहने: मुंबई, पुणे, कोरेगाव, सोलापूर बाजूनं येणारी सर्व अवजड वाहने आणि एस.टी. बसेस ‘वाढे फाटा – जुना आर.टी.ओ. चौक – पारंगे चौक’ मार्गे सातारा बसस्थानकात प्रवेश करतील.
सदर बंदीतून दुचाकी,चारचाकी वाहने,शाळेच्या बसेस, कार, ऑटो रिक्षा,रुग्णवाहिका,पोलीस वाहने आणि अग्निशामक दलाच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.या वाहनांना नेहमीप्रमाणेच प्रवेश असेल.नागरिकांनी या वाहतुकीतील बदलाची नोंद घ्यावी आणि पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्याकडून करण्यात आले आहे.



